शुक्रवार, २५ जुलै, २०१४

फक्त आमच्यासाठी...

खूप कोसळतोस मुसळधार
तेव्हाही कुठेतरी ठेवतोसच
कोरडी रिकामी जागा,
म्हणून तर घेता येतो
मला आसरा आडोशाला,
आणि पक्ष्यांनाही
शोधता येते जागा
पंख फडफडवित
उब भरून घेण्यासाठी,
आणि गायींना
लेकराच्या मुखात
आचळ रिकामे करण्यासाठी,
जगाचे रक्षण करण्याची
शपथ घेतलेल्या
भटक्या कुत्र्यांना
निर्विघ्नपणे झोप काढण्यासाठी;
धारांमध्येही कोरडेपण जपतोस
फक्त आमच्यासाठी...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २२ जुलै २०१४

तो

समोरून काढलेला
पाठमोरा काढलेला
डाव्या बाजूने काढलेला
उजव्या बाजूने काढलेला
प्रकाशातला, अंधारातला
अंधार, प्रकाशाच्या मिश्रणाचा
टोपी घातलेला
पूर्ण केस काढलेला टकलू
डोक्यास रुमाल बांधलेला
गाडीतला, गाडीवरचा, पायी
विमानातला आणि बैलगाडीतला
चष्मा लावून आणि डोक्यावर चढवून
शर्ट, टी शर्ट, झब्बा, कुर्ता
हसरा, नाचरा, रडका, उदास
कित्येक रंग, किती आकृती
कित्येक भाव, किती विकृती
आयुष्यातल्या किती अवस्था

****************************
समोर फोटोंचा ढीग
स्वत:ला निरखत
स्वत:लाच ओळखण्याचा खेळ

******************************
समोर फोटोंचा ढीग
मला निरखत
मला ओळखण्याचा खेळ
इतरांचा
त्या खेळातील स्वगतं-
किती वेगळाच आहे ना हा फोटो
यात तर ओळखायलाच येत नाही
यात किती वेगळाच दिसतो ना
हा तुझा फोटो आहे?
छे, हा नक्कीच दुसरा कोणीतरी
इतका गोरा कधी होता तू?
यात खूपच काळा दिसतो

*****************************
मला न पटलेली माझी ओळख
इतरांना न पटणारी माझी ओळख

******************************
फोटोंचा ढीग कुणीतरी आवरतं
एक एक करून नजरेखालून घालतं
त्याचं स्वगत-
अरे, हे तर सगळे तुझेच फोटो

*****************************
रंग, रूप, प्रकाश, कपडे
साऱ्यात वाटून मग
मला शोधणारा
मी आणि इतर... ... ...
रंग, रूप, प्रकाश, कपडे
याच्या आतील
मला पाहणारा तो... ... ...

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २४ जुलै २०१४

गुरुवार, १७ जुलै, २०१४

खिडकीबाहेर वाजणारा पाऊस

खिडकीबाहेर वाजणारा पाऊस
कधी छेडतो सतार,
कधी फुंकतो बासरी
कुणासाठी वाजवतो यमन
आणि कुणासाठी अभोगी

खिडकीबाहेर वाजणारा पाऊस
येतो दूर समुद्रावरून
कधी जातो चिंब भिजवून
कधी जातो कोरडं करून
कुणाचं तरी अंतरंग

खिडकीबाहेर वाजणारा पाऊस
उतरत जातो मनात खोल
समजून घेता त्याचे बोल
मुक्यानेच सावरतो तोल
किशोरीच्या `सहेला रे'चा

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १७ जुलै २०१४

रविवार, १३ जुलै, २०१४

पाऊलखुणा...?? !!!

किती चाललो?
कोणास ठाऊक,
बरेचदा उगवला सूर्य
आणि चंद्रही पौर्णिमेचा,
तरीही दिसत नाही
एकही खुण
मातीवर उमटलेल्या पावलाची
ना माझ्यापुढील रस्त्यावर
ना माझ्यामागील रस्त्यावर;
लाखो माणसांनी तुडवलेला हा रस्ता
एकाही पाऊलखुणेशिवाय?
आणि आपल्या पाऊलखुणा?
त्याही नाहीत...
अरे हो... विसरलोच की,
रस्त्याच्या प्रारंभाला उभ्या
रखवालदाराने घातलेली
एकमेव अट
या रस्त्याने जाण्यासाठी-
प्रत्येक पुढचे पाऊल टाकण्याआधी
मागच्या पावलाची खुण
पुसून टाकण्याची
आणि नाहीच पुसली एखाद्याने तर?
तो स्वत:च पुसतो म्हणे...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १३ जुलै २०१४