बुधवार, ११ जून, २०१४

विभूतीदान

दूर जंगलातील शिव मंदिरात
जाणारी दोन पावले
प्रदक्षिणा घालतात रोज संध्याकाळी
तेथील वडा, पिंपळाला
थबकतात गोमुखाजवळ
भरून घेतात श्वासाश्वासातून
गंधवतीलाही लाजवणारा
अज्ञात धुपाचा घनगंभीर सुगंध
परततात उद्याची आशा घेऊन
आजची आशाओंजळ
कुंडात रिकामी करून,
कधीतरी येणाऱ्या
कुणा अज्ञात फकिराकडून
मिळावयाच्या ओंजळभर विभूतीसाठी
अखंड सुरु असलेली पायपीट
फळाला येते एक दिवस
प्रदक्षिणा संपतात
पावले थबकतात गोमुखाजवळ
मिटलेले नेत्र उघडतात
समोर उभ्या फकिराला पाहण्यासाठीच
अविचल भावाने फक्त ओंजळ पुढे होते
विभूतीने भरलेला आपला वाडगा
फकीर हाती ठेवतो
अखंड चालणाऱ्या दोन पावलांच्या मालकाच्या
अन सुरु होते फकिरी
त्या दोन पावलांची
जगभरात विभूती वाटण्यासाठी

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ११ जून २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा