शुक्रवार, २३ मार्च, २०१८

वाहणाऱ्या या नदीला


वाहणाऱ्या या नदीला काठ नाही
वाहत्या वाऱ्यास येथे बंध नाही...
कोकिळेची आर्जवेही डोलणारी
या सुरांना आदि नाही अंत नाही...
मुक्ततेचा छंद वाहे काव्यातूनी
चिंतना येथे दिशांची वाण नाही...
शब्द नाही, अर्थ नाही, नाद नाही
मौन संवादास येथे बांध नाही...
कारणांची रास येथे ओतलेली
विश्वव्यापी तर्कटांचा घोळ नाही...
वाहण्याचा धर्म येथे पाळलेला
या प्रवासी थांबण्याची सोय नाही...

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २२ मार्च २०१८

सोमवार, १२ मार्च, २०१८

फडफड


रात्रीच्या आठ नऊचा सुमार
चौकातल्या वळणावर
लगबग सुरू होते
दहाएक वर्षांच्या
तीन चार मुलांची
दुकानाची आवरसावर करायला...
फडफड फडफड आवाज येतात
मुलांनी पाय धरून
जाळीच्या पिंजऱ्यात टाकलेल्या
कोंबड्यांच्या पंखांचे...
काय बोलत असतील ते पंख?
काल रात्री वस्तीला असलेल्या
अन आज नसलेल्या
मित्र मैत्रिणींविषयी
की,
एक रात्र अधिक वाट्याला आली त्याबद्दल?
मुले बंद करतात पिंजरे
दुकानही बंद होते
पलिकडे देवळात
'सर्वेपि सुखिन: सन्तु'
मौन पांघरते
माझ्या निद्रापूर्व प्रार्थनेसारखे

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ११ मार्च २०१८

शनिवार, ३ मार्च, २०१८

होळी


जाळून टाकायचे असतात
मनातील राग, द्वेष, विकार, विकल्प
होळीत टाकून,
लहानपणापासून
सांगत असत सगळे...
त्यांचं ऐकून
केलीही सुरुवात त्याला
सुरू झाली रागद्वेषाची होळी
पण... ... ...
एक होळी आटोपल्यावर
येत असे रागद्वेषाचे पीक तरारून
पुन्हा पुढल्या होळीपर्यंत...
एक झेंगटच लागले मागे
रागद्वेषाची होळी पेटवण्याचे,
मग ठरवले
पूर्ण बंदोबस्त करायचा
कायमचा
पुन्हा पुन्हा तेच तेच बरे नाही
अन निर्धाराने पेटवली होळी
रागद्वेष तयार करणाऱ्या यंत्राची
दिली आहुती स्वतःचीच...
आता चिंता नाही
रागद्वेषाचे पीक
आता तरारणार नाही

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २ मार्च २०१८