मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

अज्ञात झऱ्यावर


अज्ञात झऱ्यावर
अबोल पक्षी येतो
अंधार दाटताना
आभाळ होत जातो

अश्रूत गोठलेल्या
आलाप, सूर, ताना
अक्षय्य आर्ततेने
अंजुलीत धरतो
आता तरी सरू दे
अंधारयुग माझे
आवाज देत ऐसा
ओढ्यास सोपवितो
आवेग दाटुनिया
ओढा उचंबळे तो
आसावल्या दिठीने
अश्रूत साठवितो
अश्रूस आवरेना
आकाश त्या पुरेना
अवकाश पाखराचा
आता कुठे उरे ना
अद्भुत त्याचवेळी
आली उरात हाक
आकाश शब्द बोले
आलो पाहा मी खास
आवाज ऐकता हा
आल्हाद त्यास झाला
अद्वैत विठ्ठलाचा
अलवार भास झाला
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ३१ ऑक्टोबर २०१७

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

चांदणभूल


मी मागून घेतो थोडे
अवसेला ओले गाणे
शून्यात ठेवूनी देतो
रातकिड्यांचे रडणे

डोळ्यांना दिसते काही
दाराशी भिजते जाई
आकाशी चांदणवेळा
पाण्यावर आल्या गायी
अतृप्त तृप्तीचा देठ
काळजा घालीतो वेढे
रस्त्याने धावत जाती
रातीला कुठले वेडे
साठवतो कानी तेव्हा
अज्ञात मुके ते सूर
पावलात नक्षत्रांच्या
अडके चांदणभूल
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २६ ऑक्टोबर २०१७

वेदनेस...


मावळतीचा गंध नसे ज्या
अशा वेदने ये ये ये
अनाम अद्भुत अंतरंगीच्या
अतुल वेदने ये ये ये

क्षणैक तळपुनी अस्ता जाई
अशा जगातुनी ने ने ने
नित्य साथीला सवे घेऊनी
दु:ख अनावर दे दे दे
अंधाराची तुला न भीती
कृपाळूपणे ये ये ये
तेजाचीही तुला न क्षीती
अमर वेदने ये ये ये
अचल चंद्रिके अढळ देवते
वेढून मजला घे घे घे
दांभिक जगती सत्यवतीचा
वसा अंतरी दे दे दे
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २३ ऑक्टोबर २०१७

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

पायरी

कधीतरी शिकलेला सिद्धांत
दुसऱ्या पायरीवर जायला
सोडावी लागते
पहिली पायरी;
घोकून ठेवलाय
अन जगतोही त्याप्रमाणेच,
फक्त एक प्रश्न
पडू लागलाय आताशा
ज्या दुसऱ्या पायरीवर जातो
ती खाली नेते की वर??

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १४ ऑक्टोबर २०१७

तो

तो फिरतो अजूनही
दिसतो कधीमधी
रस्त्याने जातायेताना,
किती वर्षं झालीत
माझ्या लहानपणापासून पाहतोय
म्हातारा झाला आता,
त्यावेळी असायची मुलं
त्याच्या मागेपुढे
त्यांच्या गोंधळावरूनच
कळायचं, तो आलाय
आता नाही कळत तसं...
एकटाच फिरत असतो
कोणी नाही ओढत
त्याचा शर्ट
कोणी नाही मारत
त्याला हाका
वेगवेगळ्या नावांनी...
तोही नाही देत उत्तर-
आता कोणालाच
किंवा
खाली वाकून
नाही उचलत एखादा दगड
मुलांवर भिरकवायला;
त्याचं वेडंही
अनाथ झालंय आता... !!!

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १४ ऑक्टोबर २०१७