शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

प्रवाह

युगायुगांची नक्षी लेवून
युगे युगे मी चालत आहे
युगायुगांना साक्षी ठेवून
युगे युगे मी वाहत आहे

युगायुगांची गंधित गाणी
युगे युगे मी गुणगुणतो
युगायुगांची पार्थिव लेणी
युगे युगे मी खरवडतो

मी युगद्रष्टा, युगस्रष्टा मी
मी युगकर्ता, युगधर्ता मी
युगपालक मी, मी युगचालक
युगाचार्य मी, मी युगवाहक

युगापूर्वी मी, मी युग-नंतर
युगातून मी, मी युग-अंतर
युगायुगांचे जगणे मरणे
युगायुगांना कवेत घेऊन

युगायुगांची अखंड सरिता
युगायुगातून वाहत आहे
कालपटावर काळ होऊनी
युगे युगे मी धावत आहे

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, दि. २३ डिसेंबर २०१६

गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

उबदार


खूप थंडी वाजत होती
कुडकुडत होतो
इकडेतिकडे शोधलं
काही मिळतंय का म्हणून
शाल, स्वेटर, रजई
कांबळे, गोधडी वगैरे
नाही मिळालं काहीही
हां, एक आगपेटी मात्र सापडली
म्हटले शेकोटीच पेटवू
पुन्हा एकदा शोधमोहीम
कागद, काटक्या, चिंध्या
लाकडं, खर्डे किंवा गोवऱ्या
पुन्हा नन्नाचा पाढा
नाही सापडलं काहीच
मग पेटवली शेकोटी-
- स्वत:चीच...
आता कसं उबदार वाटतंय अगदी....


- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ८ नोव्हेंबर २०१६

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

तरंग

काठावर उभा राहून
पाहत होतो
अनिमिष नेत्रांनी
सरोवराच्या पाण्यावर उठणारे
एकमेकांशी शिवाशिवी खेळणारे
तरंग,
पाहता पाहता वाटले
कुठे असेल याची सुरुवात
कुठे असेल याची समाप्ती,
निघालो शोधायला
उतरलो सरोवरात
मागे टाकत गेलो
एक एक तरंग
एकामागून दुसरा
दुसऱ्यामागून तिसरा
तिसऱ्यामागून चौथा
पाचवा, सहावा... दहावा...
शंभरावा... हजारावा...
... ... ... ... ... ... ... वा
तरंगच संपत नव्हते
सुरुवात कुठे सापडायला?
मग केला विचार
शेवटापासून करू सुरुवात
शेवटच पोहोचवेल प्रारंभाला
दाखवेल रस्ता,
मग उलट प्रवास सुरु केला
मागे टाकत गेलो
एकेक तरंग पुन्हा एकदा,
पुन्हा दमछाक
शेवटलं टोक मात्र गवसलंच नाही,
मग दिलं झोकून
सरोवराच्या पाण्यावर
तरंग बाजूला ठेवून
तरंगत राहिलो निमूटपणे
काही वेळ गेला असाच,
अन सुटलं की कोडं...
हे काय?
माझ्यापासूनच सुरु होतायत हे तरंग
अन
माझ्याजवळच येऊन संपतायत सुद्धा...
अहाहा... गवसलं, गवसलं, गवसलं...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ८ नोव्हेंबर २०१६

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

सोबत...

आयुष्य चालत असतं
चालायलाच हवं,
दिवाळी येतच असते
यायलाच हवी,
उल्हास अन आनंदाने साजरी होते
व्हायलाच हवी,
सीमेवरच्या जवानांची आठवण येते
यायलाच हवी,
मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याचा चेहरा आठवतो
आठवायलाच हवा,
कष्टाने हातपाय ओढणारे डोळ्यापुढे येतात
यायलाच हवेत,
हृदयात एक कळ उठते
उठायलाच हवी,
डोळ्यात थेंब साचतो
साचायलाच हवा,
आनंदाच्या क्षणी
कशा कळ हवी?
आनंदाच्या क्षणी
का डोळा पाणी?
असं म्हणून त्यांना टाळू नका...
शत्रूच्या गोळ्या सोबत घेऊन
जगतात जवान,
उन पाउस सोबत घेऊन
जगतात किसान,
कष्टांची सोबत घेऊन
जगतात अनेक,
तुमच्या माझ्यासाठी...
तसंच, अगदी तसंच...
हृदयातली कळ
अन डोळ्यातला थेंब
सोबत घेऊन जगू या,
थोडं थोडं त्यांच्यासाठी,
कदाचित आपणच आपल्यासाठी...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २९ ऑक्टोबर २०१६

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

शेंदूर

तो फासतो शेंदूर
आणि, माझा देव होतो
सुरु होते भक्ती
आराधना, उपासना
मागण्यांचे अन अपेक्षांचे गाठोडे
रोज येऊन पडते पुढ्यात
धन्यवादांचे हारही पडतात शिरावर
कडकडा बोटेही मोडली जातात
माझ्या नावाने माझ्याच पुढ्यात
कोणाच्या पूर्ण होतात इच्छा
अन कोण होतात हताश
नाही माहीत काहीही,
पण लाडू पेढे खोबऱ्याचा
माझा रतीब मात्र सुखेनैव चालतो
माझे दगडपण आणखीनच पुष्ट होते;
तो फासतो शेंदूर
कधी- पूजा साहित्यात मिळणारा चार आण्याचा,
कधी- गडगंज पैशाचा,
कधी- मस्तवाल सत्तेचा,
कधी- जडशिळ ज्ञानाचा,
कधी- भुसभुशीत मानाचा,
कधी- वेड्या पदप्रतिष्ठेचा,
कधी- क्षणिक रूपाचा,
कधी- गोंडस गुणांचा,
लाडू पेढे खोबऱ्याचा
रतीब सुटत नाही
दगडपण पुष्ट होणे थांबत नाही

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २१ ऑक्टोबर २०१६

बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

अबद्ध, आबद्ध


अज्ञाताचा हात धरून
आलेले सगळे सूर
आश्वासक असतातच
असे नाही
अद्भुत असलेत तरीही
आल्हादक असतातच
असे नाही
आपल्याच नादात असतात
आपल्याच तालात डोलतात
आवेगाने येतात
आल्या पावली जातात
आवर्त घेतातच
असेही नाही
ओंजळीत रेंगाळतात किंवा
ओसंडून वाहुनही जातात
अलभ्य
अस्पर्शित
अपार्थिव
अबद्ध, पण
आबद्ध करणारे...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १४ ऑगस्ट २०१६

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

एवढ्याचसाठी...


एकाने विचारले-
थोडे छद्मीपणेच,
म्हणाला-
तू अजूनही पाहतो
टीव्हीवरचा २६ जानेवारी?
दरवर्षी तेच तेच
कंटाळा नाही येत
मनात होतं त्याच्या-
किती बोर आहेस तू
अन बाळबोध सुद्धा...
त्याच्या मनातल्या
बाहेर न पडलेल्या भावनेकडे
दुर्लक्ष करून मी म्हणालो-
हो,
मी पाहतो दरवर्षी
टीव्हीवर २६ जानेवारी
अन झाडून घेतो राख
माझ्या देशभक्तीवर जमलेली
नाही होता आलं शूरवीर
अन शिस्तशीर
तरीही
करतो मनाशी निश्चय पुन्हापुन्हा
शौर्य अन शिस्तीचा
हा कार्यक्रम पाहताना,
ही ठिणगी विझू नये म्हणून
पाहतो हे सारे वारंवार
योग्य वेळी सत्वासाठी, स्वत्वासाठी, सत्यासाठी
अन या मृण्मयी भासणाऱ्या चिन्मयीसाठी
जोहार करण्याची गरज पडेल तेव्हा
आवश्यक ती स्फूर्ती, शक्ती अन आग
पेटवेल ही ठिणगी...
तेवढ्यासाठीच पाहत असतो
हा तुला `बोर' वाटणारा कार्यक्रम...
त्याला काय वाटले कोणास ठावूक...


- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २६ जानेवारी २०१६