बुधवार, २२ ऑक्टोबर, २०१४

काव्यदेवता

अचानक एक आकृती
समोर उभी ठाकली
म्हणाली-
मला तुझ्या डायरीत बसायचंय,
मी म्हटलं-
अगं डायरीत जागा नाही,
तशी ती आकृती म्हणाली-
एक पान आहे की: शेवटलं,
मी म्हटलं-
हो, ते कोरंच ठेवलंय
मुद्दाम
एका विशेष कवितेसाठी,
आकृती म्हणाली-
काय म्हणतोस?
वेडा की खुळा?
मी बुचकळ्यात पडलो,
तशी ती म्हणाली-
अरे, मी प्रत्यक्ष कविता
- काव्यदेवता !!
जगातल्या साऱ्या कवींच्या
कवयित्रींच्या माध्यमातून
ज्या कविता शब्दरूप घेतात
त्या माझेच अंश
सारं काव्य माझ्यातूनच
स्रवतं, प्रसवतं...
मी शहारलो...
साऱ्या कवितांचं अधिष्ठान,
अधिष्ठात्री काव्यदेवता
माझ्या डायरीत जागा मागत होती
मी सहर्ष, विनम्र होकार दिला
तीही ऐटीत विराजमान झाली,
मी खुशीत होतो
पूर्णत्वाला पोहोचल्याच्या
पण... पण...
फार पंचाईत झाली आता-
सारं काही थबकलंय, थांबलंय
चैतन्य नाही, हालचाल नाही
सारं कसं गपगार !
काव्यदेवते,
काय केलंस हे, काय केलंस हे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

आज एक कविता पाहिली

(अॅड. समृद्धी पोरे आणि संजय पोरे यांचा `डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो' हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यावर मनात उमटलेले तरंग.)


आज एक कविता पाहिली

आज एक कविता पाहिली
चालती बोलती कविता
पडदा व्यापून उरणारी कविता
प्रत्येक चौकटीच्या गवाक्षातून
डोकावणारी कविता,
घनदाट जंगलात
माणसांची वस्ती फुलवणारी कविता
खोऱ्याने पैसा ओढण्याची
संधी दूर सारून
जंगल जवळ करणारी, अन
महाविद्यालयातील रुपगर्विता
जंगलात कशी रमते
हे सांगणारी कविता;
सुखदु:खांच्या वेगवेगळ्या परिभाषा
समजावून सांगणारी कविता-
अभावांच्या जीवनगाण्याची कविता-
पदोपदी संघर्षाची, करुणेची
अन व्रतस्थतेची कविता-
आसऱ्याला आलेल्या
दोन दिवसांच्या मुलीला
वाढवता वाढवता
काळजी घेणारी बाई
आई कशी होते
हे दाखवणारी कविता-
जंगली प्राण्यांना माया लावणारी कविता-
दूर दूर पळणाऱ्या आदिवासींना
जवळ आणून विश्वास जागवणारी कविता-
पुस्तक वाचून मोतीबिंदुची
शस्त्रक्रिया करणारी कविता-
जंगली जनावरांच्या विरहाच्या जाणीवेने
झोपेतून दचकून उठणारी कविता-
वाघ आणि बिबट यांच्यातील
फरकही न कळणारी
बथ्थड सरकारी वृत्तीची कविता-
नक्षलवादी चळवळीची
ओळख करून देणारी कविता-
नग्नतेतही अश्लीलता नसणारी
अन सौंदर्याला वस्त्रांचं ओझं न होणारी कविता-
जगण्याच्या चौकटींवर प्रहार करणारी कविता-
आयुष्याच्या फाटलेल्या गोधडीत
जगण्याचं समाधान अनुभवणारी कविता-
प्रखर प्रकाशझोतांनीही दिपून न जाणारी कविता-
पाहणाऱ्याच्या मनात माणुसकी जागवणारी कविता-
माणसाच्या मनातील माणसाला
`उठ' अशी साद घालणारी कविता-
अन,
ज्या कवितेची ही ओळख आहे ती-
कोपऱ्यात संकोचून उभी असलेली कविता
... ... ... ... ...
आज एक कविता पाहिली
चालती बोलती कविता

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १३ ऑक्टोबर २०१४

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

वाटांशी नातं जोडलं की-


मुक्कामाशी नातं तोडून
वाटांशी नातं जोडलं की
जाते पळून भितीबिती,
अवसेचा अंधारदेखील
शोधू लागतो वाट स्वत:ची,
विझलेले पथदिवेही होतात
वादळी समुद्रातील दीपगृह,
प्रत्येक पावलावर भेटते
अंतिम स्थानक प्रवासाचे,
कुठेच नसते पोहोचायचे
म्हणूनच नसते धावपळ,
अन नसते कासाविशीही
कुठे काही सुटून गेल्याची,
आनंदवाटांवरील अश्रुंचे थांबे
दु:खवाटांवरील हसुचे थांबे
वाकुल्या दाखवून खेळत असतात
वाटांच्या नातेवाईकांशी


- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ६ ऑक्टोबर २०१४