शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

कोलाहल

सर्वत्र कोलाहल
चित्रविचित्र आवाज
कर्कश्श सुद्धा,
अगदी कानात घुसून
गोंधळ घालतात जणू
जणू काही कुंभकर्णाला
उठवायचा विडाच उचललाय,
काहीही ऐकू येणं अशक्य-
तशातही मधून मधून
येतो तुझा आवाज- चिरपरिचित
अस्पष्ट, धुसर, गूढ
कळत काहीही नाही
पण मनात आश्वस्तता
हो, हाच तो आवाज
चिरपरिचित,
असंख्य आवाजांच्या कोलाहलातील
हाच तो आवाज- जो ऐकायचाय
पण दबून गेलेला,
कसे होणार या चिंतेने
व्याकुळलेला जीव
रडवेला, आसुसलेला
कानात प्राण आणून
एकेक स्वर ऐकण्याचा
समजून घेण्याचा प्रयत्न
पण असफल- प्रत्येक वेळी
कशी ओळख पटवावी?
कसा वेध घ्यावा?
सारा कोलाहल बाजूस सारून
कसे गाठावे- हव्या त्या स्वराला
तुझ्या चिरपरिचित आवाजाला...
संभ्रम आणि निराशेत असतानाच
झळकली ओळखीची खूण
अगदी ओझरती, क्षणभर
आणि बावरल्या अन
आसुसल्या मनाने
घेतली धाव- त्या खुणेच्या दिशेने
घट्ट धरून ठेवली ती प्रतिमा
आणि गाठलेच अखेर... ... ...
आता नाही कसली असोशी,
कसली तगमग, धावाधाव
संभ्रम अन अस्वस्थता,
आता फक्त त्या
चिरपरिचित नादात हरवून जाणे
तो पुन्हा हरवू नये म्हणून
बस्स...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १९ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा