सोमवार, १० मार्च, २०१४

शिवहुंकार

भयंकराला कवेत घेऊन निघतो
वादळ वाऱ्याचे तुकडे करत
भीतीबितीला गचांडी देऊन
कुस्करून टाकतो क्रूरतेची पिलावळ
अस्वस्थतेच्या सौदामिनींची मोडतोड करतो
भिरकावतो माझ्यावर स्वार होणारे
सारे विषारी सर्प
वेदनांचा रुधीराभिषेक करतो स्वत:ला
चावून चोथा करतो सगळ्या काट्यांचा
रक्तबंबाळ लसलसती जिव्हा हलवत
करू लागतो तांडव
मुळासकट अस्तित्व हादरवणारे
अन होत जातो
कणाकणाने चिरशांतीचा
अखंड वर्षाव करणाऱ्या
शिवाचा हुंकार

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १० मार्च २०१४

मंगळवार, ४ मार्च, २०१४

रातकिडे

पावसाच्या रात्री
किरकिरत राहतात
रातकिडे
न दिसणारे, न चावणारे
इकडेतिकडे न फिरणारे...
फक्त जाणीव आवाजाची
एका सुरात, एकाच लयीत...
वर नाही, खाली नाही
वेगात नाही, संथ नाही
आपल्याच तालात,
कधीही न दिसणाऱ्या आवाजाची
जखडून ठेवणारी जादू पसरत
साद घालतात
मनाच्या काळ्यामिट्ट गुहेतील
आपल्या बांधवांना,
बाहेरील रातकिडे- पावसानंतरचे
मनातील रातकिडे- पावसापूर्वीचे
एवढाच फरक
बाकी सारखंच सगळंकाही
अनाम, अदर्षित, एकाकी
कर्कशपण वगैरे...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ मार्च २०१४

रविवार, २ मार्च, २०१४

छळ

जुनाच खेळ
सुरु आहे अजूनही
लपाछपीचा;
कदाचित तुझा
सगळ्यात आवडता खेळ
आणि माझा सगळ्यात नावडता
कारण प्रत्येक वेळी
राज्य माझ्यावरच;
मी तुला हुडकून काढलं तरी
आणि तू मला `रेस' केलंस तरीही-
खरं तर बहुतेक वेळा मीच हरणार
पण कधीकधी
येत असेल माझी दया
मग, कधी शिळ घालून
खुसफुसणारे आवाज काढून
शुक शुक करून
लहानसा खडा मारून
स्वत:च सांगणार लपण्याची जागा,
मी हुडकणार तुला
मारणार आनंदाने उड्या
तरीही पुन्हा तूच लपणार
आणि मीच काढणार तुला हुडकून;
उलटापालट करू म्हटलं
तर तू जाणार निघून
रागावून वा पळून
मग मीच घेणार माघार
पुन्हा खेळ सुरु... ...
तुझ्यासोबत खेळणं
कदाचित माझी गरज,
लपाछपीच खेळायचा
तुझा हट्ट,
नेहमीच माझ्यावर राज्य
ही आपली तडजोड
*********************
तुला मजा येते मला छळण्यात
की, मलाच मजा येते छळून घेण्यात?

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २ मार्च २०१४