शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

स्वयंभू

नाही बयो

हे काही बरं नाही झालं

हरलीस तू

अन मीही निराश झालोय

दुबळं केलंस तू स्वतःला

तू केलंस मान्य पुन्हा एकदा

तुला गरज असते कोणाची तरी

कोणी तरी द्यावी लागते मान्यता तुला

कोणी तरी करावं लागतं तुझं कौतुक

नाही राहू शकत तू आधाराविना

तुझं हे लहानपण कसं पचवू?

का नाकारलं नाहीस तूच

त्या देवाचं दर्शन?

किंवा

का नाही उभा केलास

तूच तुझा स्वतंत्र देव?

अजूनही तुझा विचार चालतो

त्याच्याच संदर्भात

तुझा मान अपमान

त्याच्या मान्यतेवर अवलंबून आहे अजूनही

नाही नाकारू शकत तू

जे नाही मिळत सहजतेने, मनापासून

तुझं असणं अजूनही अडकलंय

कोणाच्या तरी मान्यतेत

कोणाच्या तरी स्वीकारात

कोणाच्या तरी पराभवात

कोणाला तरी जिंकण्यात

तुझं स्वयंभूत्व

गवसलेलंच नाही अजून तुला

स्वीकार नकारा पलीकडील असणं

स्वीकार नकारा पलीकडील चांगुलपणा

स्वीकार नकारा पलीकडील आनंद

नाहीच लागलेलं तुझ्या हाताला

बयो, चाचपडणाऱ्या बयो

दुबळ्या बयो

निराश झालोय मी

पण वाट पाहीन

त्या दिवसाची

जेव्हा तुला नसेल गरज कोणाची

तुझ्या असण्यासाठी

तुझ्या आनंदासाठी

तुझ्या सन्मानासाठी

अन तरीही चालत राहशील

घेऊन सगळ्यांना

कोणाची गरज नसतानाही

नाकारणार नाहीस कोणाला

तुझं स्वयंभुत्व

नाही राहणार अपूर्ण कशावाचून,

अन नाही होणार भार कशाचाही

त्या स्वयंभूत्वाला

सगळ्यांसह वा सगळ्यांशिवाय

अशी तू

तुला गवसेपर्यंत

पाहीन मी वाट...


- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ३० सप्टेंबर २०१८

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

कविता संग्रह

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एका सारेगम कार्यक्रमात उल्लेख केल्यामुळे सगळ्यांना ठाऊक झालेले जुन्या काळातील नागपूरचे श्रेष्ठ कवी बोबडे यांच्या समग्र कवितेच्या तिसऱ्या आवृत्त्ती चे प्रकाशन आज होते आहे. ही तिसरी आवृत्ती असली तरीही त्यांच्या हयातीत त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला नव्हता. असं पुष्कळदा होतं. तरीही ही समाधानाची गोष्ट आहे.

(या समाधाना नंतर एक थोडा गमतीचा विचार आला... आपलीही समग्र कविता आपल्या नंतर प्रकाशित होऊ शकेल. अन् त्यामुळे आपण मुळात नसलो तरीही मोठे कवी म्हणून प्रसिद्ध होऊ. 😄)

(स्व. बोबडे हे मोठेच कवी आहेत. मला आवडतात आणि आदरही आहे. कृपया गैरसमज नसावा. मी स्वतबद्दल गंमत केली आहे.)

- श्रीपाद कोठे

१७ सप्टेंबर २०२२

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

तूची तू

अद्वैत अव्यक्त

अगम्य अतर्क्य

अद्भुत अजब

तूची तू


काळोख काजळ

कदंब कुसुम

कालिंदी कौतुक

तूची तू


निर्मळ निर्भय

निर्गुण नि:शंक

निरव निधान

तूची तू


प्रीतीचा प्राजक्त

प्रज्ञान प्रसन्न

प्राणांचा प्रकाश

तूची तू

- श्रीपाद कोठे

बुधवार, ६ सप्टेंबर २०२३

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

तो

तो राहत असे

असाच गबाळ्या, हरवलेला

लोक हसत त्याला

थट्टा करत

नावे ठेवत;

त्याला वाईट वाटे

राग येई, दुखे...

अजूनही तो राहतो

तसाच गबाळ्या, हरवलेला

अजूनही लोक हसतात

थट्टा करतात

नावेही ठेवतात;

पण, त्याला वाईट वाटत नाही

राग येत नाही, दुखत नाही...

आता तो हसतो लोकांबरोबर

पण,

लोक त्याला हसत असतात

तो लोकांच्या हसण्याला...

- श्रीपाद कोठे

१४ सप्टेंबर २०२२

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

कसा रे तू?

 

कसा रे तू?

अजूनही विश्वास टाकतोस सगळ्यांवर

कमी तोंडघशी पडलास का आजवर

पैसा म्हणू नको

प्रेम म्हणू नको

शब्द म्हणू नको

मैत्री म्हणू नको

नाती म्हणू नको

माणुसकी म्हणू नको

किती वेळा तोडलाय विश्वास तुझा

तरीही तू तसाच

बावळट, व्यवहारशून्य

शेकडो वेळा विश्वासघात होऊनही

सगळ्यांवर विश्वास टाकत सुटतो;

त्याची कळकळ शांत झाल्यावर

हा म्हणाला-

मित्रा, तू खूप चांगला आहेस

पण तुझं गणित थोडं पक्क करून घे

या जगाची लोकसंख्या आहे ७०० कोटी

अन आपल्या शहराची म्हणशील

तर तीही काही लाखात

आणि तूच म्हणतोस ना

शेकडो वेळा माझा विश्वासघात झालाय

मी म्हणतो

फक्त शेकडो वेळा

अजून खूप जग बाकी आहे

विश्वास टाकायला

अन तुला सांगू?

७०० कोटी विश्वासघात झाले तरीही

विश्वास टाकणे थांबवणार नाही

अगदी ईश्वराने विश्वासघात केला तरीही

जोवर मीच माझा विश्वासघात करीत नाही

तोवर विश्वास थांबवण्याचं

मला कारणच नाही

अन मला नाही वाटत

मीच माझा विश्वासघात करेन म्हणून

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ११ सप्टेंबर २०१७

शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

अनोळखी !

पक्षी येतात अंगणात
कधीतरी
आणून टाकतात चोचीतून
कसल्या तरी
बिया, काड्या, कपटे, कचरा
अर्धवट खाल्लेल्या
एखाद्या जीवाचा
एखादा तुकडा
घाण किंवा काहीही;
किंवा आणतात सोबत
पायांना किंवा पंखांना चिकटवून
काही परागकण
अनोळखी झाडांचे
अन देतात विखरून
कुण्या अंगणात
झाडांच्या बदललेल्या
पाना फुलांची
आश्चर्यगंमत दाखवण्यासाठी;
कोणते पक्षी?
कसे पक्षी?
कुठले पक्षी?
सारंच अनोळखी...
भाळावर लिहितात
कधी त्रास, कधी वैताग
कधी आनंद, कधी आश्चर्य
.... .... .... ....
सगळंच कसं
आपल्या जगण्यासारखंच !

- श्रीपाद कोठे
शुक्रवार, ११ डिसेंबर २०२०

कविता

अस्तित्वाच्या

अंधाराची
आवर्तने -
आक्रोशतात
अनावरपणे,
आळसावतात
अपार,
आवळतात
आत्म्याला
अनिर्बंध,
अव्हेरतात
अष्टौप्रहर,
आठवतात
अविच्छिन्नपणे,
आढळतात
अखंडपणे,
आदळतात
अस्तित्वगाभ्यावर,
अन
होतात कविता !!

- श्रीपाद कोठे
रविवार, १३ डिसेंबर २०२०