नाही बयो
हे काही बरं नाही झालं
हरलीस तू
अन मीही निराश झालोय
दुबळं केलंस तू स्वतःला
तू केलंस मान्य पुन्हा एकदा
तुला गरज असते कोणाची तरी
कोणी तरी द्यावी लागते मान्यता तुला
कोणी तरी करावं लागतं तुझं कौतुक
नाही राहू शकत तू आधाराविना
तुझं हे लहानपण कसं पचवू?
का नाकारलं नाहीस तूच
त्या देवाचं दर्शन?
किंवा
का नाही उभा केलास
तूच तुझा स्वतंत्र देव?
अजूनही तुझा विचार चालतो
त्याच्याच संदर्भात
तुझा मान अपमान
त्याच्या मान्यतेवर अवलंबून आहे अजूनही
नाही नाकारू शकत तू
जे नाही मिळत सहजतेने, मनापासून
तुझं असणं अजूनही अडकलंय
कोणाच्या तरी मान्यतेत
कोणाच्या तरी स्वीकारात
कोणाच्या तरी पराभवात
कोणाला तरी जिंकण्यात
तुझं स्वयंभूत्व
गवसलेलंच नाही अजून तुला
स्वीकार नकारा पलीकडील असणं
स्वीकार नकारा पलीकडील चांगुलपणा
स्वीकार नकारा पलीकडील आनंद
नाहीच लागलेलं तुझ्या हाताला
बयो, चाचपडणाऱ्या बयो
दुबळ्या बयो
निराश झालोय मी
पण वाट पाहीन
त्या दिवसाची
जेव्हा तुला नसेल गरज कोणाची
तुझ्या असण्यासाठी
तुझ्या आनंदासाठी
तुझ्या सन्मानासाठी
अन तरीही चालत राहशील
घेऊन सगळ्यांना
कोणाची गरज नसतानाही
नाकारणार नाहीस कोणाला
तुझं स्वयंभुत्व
नाही राहणार अपूर्ण कशावाचून,
अन नाही होणार भार कशाचाही
त्या स्वयंभूत्वाला
सगळ्यांसह वा सगळ्यांशिवाय
अशी तू
तुला गवसेपर्यंत
पाहीन मी वाट...
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३० सप्टेंबर २०१८