मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

धावत धावत ये ना


मी आर्त मनाने जेव्हा
साद घालतो तुजला
शब्दांच्या गाठी सोडून
तू शब्द होऊनी ये ना


मी गोंजारून शब्दांना
पोशाख घालूनी देतो
पाऊल गोंदूनी तूही
पैंजण होऊनी ये ना

पैंजणमुग्ध मनाने
जेव्हा मी चित्र रेखितो
अग्रातून तुलिकेच्या
तू रंग होऊनी ये ना

मी रंगबावरा वेडा
श्वासांनी विणतो धागे
तू महावस्त्र सृष्टीचे
सुगंध होऊनी ये ना

मी सुगंधी भिजलेला
आतूर पाहतो वाट
लपलेल्या हे कविते
धावत धावत ये ना

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २४ डिसेंबर २०१७

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

काजळशाई


काळीज कुस्करून काढलेली
काजळशाई
कवितेच्या हाती देताच
कवितेने
कुंचला शाईत बुडवला
कागदावर फिरवला,
कोऱ्या कागदाने
काळोखाच्या शपथा
कोरून घेतल्या,
कागद काळा झाला
कालकूट प्राशन करून


- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २५ नोव्हेंबर

ओंडका


वसा ओंडक्याचा
कसा दूर सारू
ललाटी असे जे
त्या, कैसे अव्हेरू?

कुठे जावयाचे?
कुठे जात आहे?
प्रवाहास ठावे,
मला काय त्याचे?
कुणी सोबतीला
येऊन मिळती
अकस्मात आणि
कुठे दूर जाती
क्षणांचीच नाती
क्षणांचा पसारा
प्रवाहास नाही
कुठेही किनारा
असा ओंडक्याचा
वसा लाभलेला
हवासा असो वा,
नकोसा जरी हा

- श्रीपाद कोठे
नागपूर
३ डिसेंबर २०१७

कविते,


कविते,
तुझी कर्तव्ये दोनच...
तुला ठाऊक नसतील
म्हणून सांगतो-
वाचणाऱ्याला
आनंद अन समाधान देणे;
घडवणाऱ्याला
त्रास अन दु:ख देणे


- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १० डिसेंबर २०१७