शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

प्रवाह

युगायुगांची नक्षी लेवून
युगे युगे मी चालत आहे
युगायुगांना साक्षी ठेवून
युगे युगे मी वाहत आहे

युगायुगांची गंधित गाणी
युगे युगे मी गुणगुणतो
युगायुगांची पार्थिव लेणी
युगे युगे मी खरवडतो

मी युगद्रष्टा, युगस्रष्टा मी
मी युगकर्ता, युगधर्ता मी
युगपालक मी, मी युगचालक
युगाचार्य मी, मी युगवाहक

युगापूर्वी मी, मी युग-नंतर
युगातून मी, मी युग-अंतर
युगायुगांचे जगणे मरणे
युगायुगांना कवेत घेऊन

युगायुगांची अखंड सरिता
युगायुगातून वाहत आहे
कालपटावर काळ होऊनी
युगे युगे मी धावत आहे

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, दि. २३ डिसेंबर २०१६

गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

उबदार


खूप थंडी वाजत होती
कुडकुडत होतो
इकडेतिकडे शोधलं
काही मिळतंय का म्हणून
शाल, स्वेटर, रजई
कांबळे, गोधडी वगैरे
नाही मिळालं काहीही
हां, एक आगपेटी मात्र सापडली
म्हटले शेकोटीच पेटवू
पुन्हा एकदा शोधमोहीम
कागद, काटक्या, चिंध्या
लाकडं, खर्डे किंवा गोवऱ्या
पुन्हा नन्नाचा पाढा
नाही सापडलं काहीच
मग पेटवली शेकोटी-
- स्वत:चीच...
आता कसं उबदार वाटतंय अगदी....


- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ८ नोव्हेंबर २०१६