शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

सोबत...

आयुष्य चालत असतं
चालायलाच हवं,
दिवाळी येतच असते
यायलाच हवी,
उल्हास अन आनंदाने साजरी होते
व्हायलाच हवी,
सीमेवरच्या जवानांची आठवण येते
यायलाच हवी,
मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याचा चेहरा आठवतो
आठवायलाच हवा,
कष्टाने हातपाय ओढणारे डोळ्यापुढे येतात
यायलाच हवेत,
हृदयात एक कळ उठते
उठायलाच हवी,
डोळ्यात थेंब साचतो
साचायलाच हवा,
आनंदाच्या क्षणी
कशा कळ हवी?
आनंदाच्या क्षणी
का डोळा पाणी?
असं म्हणून त्यांना टाळू नका...
शत्रूच्या गोळ्या सोबत घेऊन
जगतात जवान,
उन पाउस सोबत घेऊन
जगतात किसान,
कष्टांची सोबत घेऊन
जगतात अनेक,
तुमच्या माझ्यासाठी...
तसंच, अगदी तसंच...
हृदयातली कळ
अन डोळ्यातला थेंब
सोबत घेऊन जगू या,
थोडं थोडं त्यांच्यासाठी,
कदाचित आपणच आपल्यासाठी...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २९ ऑक्टोबर २०१६

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

शेंदूर

तो फासतो शेंदूर
आणि, माझा देव होतो
सुरु होते भक्ती
आराधना, उपासना
मागण्यांचे अन अपेक्षांचे गाठोडे
रोज येऊन पडते पुढ्यात
धन्यवादांचे हारही पडतात शिरावर
कडकडा बोटेही मोडली जातात
माझ्या नावाने माझ्याच पुढ्यात
कोणाच्या पूर्ण होतात इच्छा
अन कोण होतात हताश
नाही माहीत काहीही,
पण लाडू पेढे खोबऱ्याचा
माझा रतीब मात्र सुखेनैव चालतो
माझे दगडपण आणखीनच पुष्ट होते;
तो फासतो शेंदूर
कधी- पूजा साहित्यात मिळणारा चार आण्याचा,
कधी- गडगंज पैशाचा,
कधी- मस्तवाल सत्तेचा,
कधी- जडशिळ ज्ञानाचा,
कधी- भुसभुशीत मानाचा,
कधी- वेड्या पदप्रतिष्ठेचा,
कधी- क्षणिक रूपाचा,
कधी- गोंडस गुणांचा,
लाडू पेढे खोबऱ्याचा
रतीब सुटत नाही
दगडपण पुष्ट होणे थांबत नाही

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २१ ऑक्टोबर २०१६