मंगळवार, २९ एप्रिल, २०१४

आंदुळता तरंग

आभासांच्या आडोशाने
अवखळ नाचतो
आत्मग्लानी येईपर्यंत,
अनादी प्रलयाच्या
अविराम लाटांना
आलिंगतो वारंवार,
अस्पष्ट सावल्यांना
आधार बनवून
अखंड खेळतो,
अमर्याद थकल्यावर
आगंतुक हाक येते
अवसेच्या चंद्रासारखी,
अज्ञात गुहेतील
अपार सरोवरावर उठतो
आंदुळता तरंग

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २९ एप्रिल २०१४

सोमवार, २१ एप्रिल, २०१४

दुपारी चारची वेळ

दुपारी चारची वेळ कशाची असते?
गरमागरम वाफाळता चहा
आणि पार्ले-जी यांची...
एकूण आयुष्यापैकी
फार थोडे दिवस
पण सगळ्या आयुष्याचा
ताबा घेणारे...
रोजचा कार्यक्रम ठरलेला
दुपार पुढे पुढे सरकू लागे
आणि चार वाजले की,
ऑर्डर दिली जायची
न चुकता-
`एक चहा आणि एक पार्ले-जी'
दहा मिनिटात ऑर्डर तयार
मग मी चहाचा पेला धरणार
तू पार्ले-जी चा पुडा हाती घेणार
फोडणार आणि शांतपणे
एक एक बिस्कीट
माझ्या हातातील चहात
बुडवून बुडवून खाणार
मन आणि पोट भरेपर्यंत,
शब्दांना बंदी असे तेवढा वेळ...
तू चहा पीत नसे
तुझं खाणं संपलं की
मी चहा संपवायचा;
कोणी कोणाला काय दिलंय
कोणी कोणाचं काय हिरावलंय
माहीत नाही
शब्दांना बंदी असणाऱ्या
त्या क्षणांमध्ये
नयनांची मात्र अखंड बडबड
त्यांनीच ठरवलंय
दुपारी चारची वेळ
चहा अन पार्ले-जी ची म्हणून...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २१ एप्रिल २०१४

शनिवार, १९ एप्रिल, २०१४

सखीवेळ

सखीची अशी वेळ नादावणारी
अशब्दातुनी काय ती सांगते?
युगांच्या मुक्या सांजवेळी कशाला
तळ्याच्या तळाशी पाय घोटाळते?

उग्या बिल्वरांचे कल्लोळ भवती
दिशांची पिसे टोचती का मना?
मऊशार मातीत धास्तावलेल्या
दिशा गोठल्या पावलांच्या खुणा

अनामिक भीती उरे सोबतीला
जशी नाचणारी सावल्यांची भुते
निशापावलांची घेऊन चाहूल
सखीवेळ पंखातुनी सांडते

तळ्याच्या सभोती शिळा मांडलेल्या
कधी थांबली नाचणारी पावले?
घोंगावणारा अतिद्वाड वारा
समाधी तरी त्यांची ना भंगते

अशा दाट वेळी, फुलारून येती
धुके सारुनी, अंधुक पावाफुले
सखीच्या उरी दाटलेल्या स्वरांची
उदासीन, उत्फुल्ल तारादळे

अशी गारुडी, वेळ ही उन्मनीची
कशी लावते मन्मनाला पिसे
कधी धावणारी, कधी थांबणारी
सखीवेळ नि:शब्द सादावते

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १९ एप्रिल २०१४

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

आरस्पानी

अभावित लाभलेली
आयुष्याची ओंजळ
अलगद धरून चालताना
अचानक धक्का लागला
अनोळखी कशाचा तरी
अडखळत धडपडलो
ओंजळ उधळली
अस्ताव्यस्त विखुरले
अनामसे बरेच काही;
अवनीने वेचले
आभाळाने टिपले
अमृताचे थेंब मिसळून
ओंजळीत पुन्हा घातले
अस्फुट दु:ख पुन्हा
आरस्पानी हसले

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १७ एप्रिल २०१४

गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

अनाहत

अज्ञातातील अजान
अवगुंठन दूर करते
अस्पष्ट जाणीवांचे
आरवू लागतात कोंबडे
आरक्त होते प्राची
आकाशगामी पाखरे
अरुणाची आरती गातात
अलक्षित गुहेत
अलख घुमू लागतो
आकृतींचे बंध वितळतात
आशय निराशय होतो
आदिअंताचा लय होतो
अन
अनाहत भरून राहतो, सर्वत्र...

- श्रीपाद कोठे
नागपूर
४ एप्रिल २०१४