बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

स्वसंवाद

'आई, हे उचलू?'
पाच वर्षांच्या
कोवळ्या आवाजाने विचारले,
'उचल की'
तिशीतील आवाज उमटला,
पंचवर्षीय गोबरे हात
बागेतल्या कुंदाखाली
बागडू लागले
फ्रॉकचा ओचा भरून गेला,
'घे हे'
पाच वर्षांचा देह
तिशीतल्या देहाला म्हणाला
ओचा रिकामा झाला पदरात
अन निवड करू लागली
तिशीतली बोटे,
'अगं,
या कळ्या का उचलल्या?
कळ्या नसतात उचलायच्या
फुले वेचायची छान
नकोत या'
मूठभर कळ्या
तिशीच्या हातातून
फ्रॉकच्या ओच्यात आल्या परत...
'काय करू यांचं?'
पंचवर्षीय कोवळा प्रश्न,
'काही नाही
टाकून दे त्या कचरापेटीत'
तिशीची आज्ञा-
पंचवर्षीय कृती-
'जीवन म्हणजे-
फुले वेचणे,
कळ्या कचऱ्यात फेकणे'
बाकावरील
पन्नाशीच्या मनाचा
स्वसंवाद !!!

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २१ नोव्हेंम्बर २०१८

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

रोबोट हवाय रोबोट

रोबोट हवाय रोबोट...
ऐकलं का?
रोबोट हवाय...
घरच्या कामांसाठी हवाय
ऑफिसच्या कामांसाठी हवाय
समाजाच्या कामासाठी हवाय,
सोप्या आणि कठीण
दोन्ही कामांसाठी हवाय
होत नाही आताशा दगदग,
अन कामेही कशी
अगदी हवी तशी
हव्या त्या मापाची,
अन हो-
परिवार म्हणून
मित्र म्हणून
प्रियकर म्हणून
प्रेयसी म्हणून
सहकारी अन सहचरी म्हणूनही
हवे आहेत रोबोट,
बरं पडतं ना-
हवं ते बोलतील
हवी तेवढं सोबत करतील
नको तेव्हा त्रास नको कुठला
भावनांचा
अपेक्षांचा
समजून घेण्याचा
समजूत घालण्याचा
adjustment चा
साद आणि प्रतिसादाचा,
कामासाठी रोबोट हवेत
विचारासाठी रोबोट हवेत
साधनेसाठी रोबोट हवेत
हसण्यासाठी रोबोट हवेत
रडण्यासाठी रोबोट हवेत;
रोबोट हवेत कुटुंबासाठी
रोबोट हवेत संस्थांसाठी
रोबोट हवेत पक्षांसाठी
रोबोट हवेत प्रेमासाठी
रोबोट हवेत द्वेशासाठी;
ना ना
माणसे नकोयत
रोबोट हवेत
तेवढी ऑर्डर लिहून घ्या
पैशाची चिंता नको
सातवा वेतन आयोग आहेच
किंवा
पैसा येतोच कसाही
तो नाहीच प्रश्न
आम्ही आहोत ना
पुरुषार्थ गाजवायला
पैसा उभा करायला;
फक्त ऑर्डर तेवढी पूर्ण करा लवकर
अन एकदा खात्री करून घ्या
माझी requirement
नीट feed केलीय तुमच्या रोबोटला याची...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १९ नोव्हेंबर २०१८

सोमवार, ५ नोव्हेंबर, २०१८

शुभेच्छा !!!

शुभेच्छा
यांना, त्यांना, त्यांना, त्यांना
सगळ्यांना शुभेच्छा !
सजीवांना शुभेच्छा
निर्जीवांना शुभेच्छा,
भारतीयांना शुभेच्छा
अभारतीयांना शुभेच्छा,
दिवाळी साजरी करणाऱ्यांना शुभेच्छा
दिवाळी साजरी न करणाऱ्यांना शुभेच्छा,
सज्जनांना शुभेच्छा
दुर्जनांना शुभेच्छा,
साधुसंतांना शुभेच्छा
चोर डाकुंना शुभेच्छा,
नीचांना शुभेच्छा
नीचोत्तमांना शुभेच्छा,
पुरुषांना शुभेच्छा
स्त्रियांना शुभेच्छा,
बालके आणि वृद्धांना शुभेच्छा
सनाथ आणि अनाथांना शुभेच्छा,
धनिकांना शुभेच्छा
गरिबांना शुभेच्छा,
हसणाऱ्या लोकांना शुभेच्छा
रडणाऱ्या लोकांना शुभेच्छा,
गंभीर लोकांना शुभेच्छा
पोरकट लोकांना शुभेच्छा,
माणसांना शुभेच्छा
निसर्गाला शुभेच्छा,
प्रकाशाला शुभेच्छा
अंधारालाही शुभेच्छा,
मित्रांना शुभेच्छा
शत्रूंना शुभेच्छा,
गोतावळ्याला शुभेच्छा
एकांताला शुभेच्छा,
भोगाला अन त्यागाला शुभेच्छा
ऐहिकतेला अन आध्यात्मिकतेला शुभेच्छा,
कधीतरी
कुठेतरी
चिरंतन एकाटपणाला
चिरंजीव एकपणा लाभण्यासाठी
साऱ्या साऱ्याला शुभेच्छा... !!!

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ५ नोव्हेंबर २०१८