मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

करुणेचा डोंगर

अंधाराच्या सावल्यातून हिंडताना
सुगंधी वारा स्पर्श करून गेला
अन, जाता जाता
कानात सांगून गेला-
माझ्या मागोमाग ये,
आज्ञाच जणू,
चालू लागलो
एखाद्या गुलामासारखा
निमूटपणे,
दिवस, महिने, वर्ष...
अन अचानक चढ लागला;
डोळ्यांचे कार्य
बंद झाले असले तरीही
पावलांच्या वेदना
अन संवेदना शाबूत होत्या तर,
वाऱ्याला पुसले- कसला चढ?
तो कुजबुजला- शांत राहा,
निमूटपणे चढत राहिलो,
कधीतरी पुन्हा वारा कुजबुजला-
थांब आणि बस या बाजूला,
तोही टेकला शेजारी,
काळ कधीचाच पडला होता मागे,
दीर्घ निवांतानंतर
पडू लागले काही आवाज कानी
छिन्नी हातोड्यासारखे
कधी वेगात, कधी संथ
कधी जोरात, कधी मंद
पुन्हा पसरली शांतता
अन वारा कुजबुजला-
आपण करुणेच्या डोंगरावर आहोत,
आता गंमत दिसेल;
अधीर डोळे
पाहणं विसरलेले,
पाहू लागले भिरभिर...
सावकाश शब्दानेही लाजावे
एवढ्या हळूहळू
प्रकाशाने स्पर्श केला डोळ्यांना
अन विस्फारितपणे पाहू लागले ते
युगांच्या अंधाराला चिरून टाकीत,
डोंगरात कोरलेली अद्भुत शिल्पाकृती
कधीही न पाहिलेली, न देखलेली...
मी वाऱ्याकडे पाहिले
त्याला कळले माझे भाव
तो एकच शब्द बोलला-
`ईश्वर'... ... ... ...
आवंढा गिळून मी विचारले-
खोदणारे शिल्पकार कुठे गेलेत?
कानात गुणगुणत गुणगुणत
न बोलता वारा निघून गेला... ...

- श्रीपाद कोठे
नागपूर,
मंगळवार, ३ फेब्रुवारी २०१५