तुझा प्रकाशाचा गावं
होवो तुज लखलाभ
माझा अंधाराचा पार
माझ्यासाठी स्वर्गतुल्य
गुलाबाचा महारस्ता
तुझ्यासाठी रे निर्मिला
मला सुखाने चालू दे
काटक्यांची पायवाट
तुझी रंगीत वसने
तुझ्यावरी शोभतात
मला माझ्या गोधडीत
सारी सुखे लाभतात
तुझे नाचरे आभाळ
चांदण्यांनी भरलेले
माझ्या अंधाऱ्या गुहेत
सोबतीस कोळीष्टके
तुझ्या प्रकाशाचा मज
नाही ध्यास, नाही खंत
माझ्या अंधाराचा आहे
सदासुखी मी महंत
- श्रीपाद कोठे
नागपूर
१७ सप्टेंबर २०१३