बुधवार, १९ जून, २०१३

अनासक्त

कोण पेरतं बी
कसं उगवतं हे गवत
ही नावंही ठाऊक नसलेली झाडं
छोटी छोटी फुलं रंगीबेरंगी
भिंतीच्या सांदीकोपऱ्यात काहीतरी
आता गेलीत असे वाटणारे
अंगणातील वेगवेगळे कंद;
पाऊस पडला की
हमखास येतात बहरून
कुठल्याही आमंत्रणाची
वाट न पाहता;
जातानाही जातात शांतपणे
सांगतही नाहीत
अन जाणवूही देत नाहीत;
कोणताही अवशेष
ठेवत नाहीत मागे
अन शून्यातून प्रकटल्यासारखी
उगवतात पावसाचे पाणी पिऊन
पुन्हा अनामपणे निघून जाण्यासाठी;
एखाद्या अनासक्त कर्मयोग्याप्रमाणे

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १९ जून २०१३